Select Page

राष्ट्रीय सेवा शिबीर २०२०

              योगेश्वरी महाविद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १३ ते १९ जानेवारी दरम्यान “राष्ट्रीय सेवा योजना” विशेष वार्षिक शिबिराचे मोजे चिचखंडी येथे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन बीड जिल्हा रासेयो समन्वयक प्रा. डॉ. लक्ष्मण मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कार रुजवणे व त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी रासेयो शिबीर घेतले जाते. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक कार्याची आवड निर्माण होत असून भविष्यातील आदर्श नागरिक शिबिरातून घडत असल्याचे प्रतिपादन डॉ. लक्ष्मण मुंडे यांनी केले. 

               या सात दिवसीय शिबिरादरम्यान ग्रामस्वच्छता, या शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्थ, शेतकऱ्यांमध्ये जलसंधारण, पर्यावरण, आरोग्य याबाबत जनजागृती केली जाणार आहे. यासाठी तज्ज्ञांची व्याख्याने होणार असून विद्यार्थीही थेट सहभागी होणार आहेत. वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धग, अंधश्रद्धा निर्मूलन व प्रबोधनपर अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. या शिबिराचे आयोजन श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे ब महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.             

             कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रा. एस. के. जोगदंड हे होते. आपल्या अध्यक्षीय समारोपात प्रा. जोगदंड यांनी युवकांना ग्रामीण जीवनाचा अभ्यास करण्याचे व त्यांच्या समस्या सोडविण्याचे आवाहन केले. याप्रसंगी अँड. शिवाजीराव कराड, चिचखंडी येथील सरपंच संगीता नवनाथराव होके, उपसरपंच अभिजित गडदे, उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. व्ही. कुलकर्णी, प्रा. डॉ. अनिल नरसिंगे, प्रा. डॉ. महेंद्र आचार्य, प्रा. संतोषकुमार सुर्वे, प्रा. डॉ. सारिका संगेकर हे उपस्थित होते. तसेच पोलिस पाटील ज्ञानोबा गडदे, अनसराम कुंडगर, अश्रूबा बिरगड, कंचना हजारे, अरुण तट हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. अनिल नरसिंगे यांनी केले. सूत्रसंचालन पंकजा किरवले व श्रेया सोनपेठकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. महेंद्र आचार्य यांनी मानले. याप्रसंगी ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.