Select Page
(Click to Zoom)
              योगेश्वरी महाविद्यालयात रेड रिबन क्लब विभागाच्या वतीने फेसपेंटिंग व फेसबुक रील द्वारे एड्स विषयी जनजागृती अंबाजोगाई: स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग बीड यांच्या वतीने युवकांमध्ये एच.आय.व्हि./ एड्स विषयी जनजागृती निर्माण व्हावी याकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. आंतरराष्ट्रीय युवा पंधरवाडा निमित्त योगेश्वरी महाविद्यालयात रेड रिबन क्लब, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, बीड व आय.सी. टि. सी., स्व.रा.ती.ग्रा.वै. महा. अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने फेस पेंटिंग व फेसबुक रील अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत चेहऱ्यावर आकर्षक पेंटिंगद्वारे एच.आय.व्हि./एड्स विषयी महाविद्यालयीन युवकांमध्ये जनजागृती निर्माण केली. या उपक्रमांचे आयोजन योगेश्वरी महाविद्यालयातील रेड रिबन क्लब समन्वयक प्रा. डॉ. अनिल नरसिंगे यांनी केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये एड्स व एचआयव्हीबाबत जनजागृती करण्यासाठी या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने युवकांमध्ये एच. आय. व्हि./एड्स विषयी योग्य असे मार्गदर्शन मिळावे यासाठी जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय बीड येथील जिल्हा कार्यक्रमाधिकारी मा. सुहास कुलकर्णी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनी आपल्या व्याख्यानाद्वारे विद्यार्थ्यांना एच.आय.व्हि./एड्स विषयी सखोल असे मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना एड्स होण्यामागची प्रमुख कारणे, एड्स या रोगाची लक्षणे, एड्स वर उपलब्ध असलेली उपचार पद्धती व समाजात एड्स आजाराविषयी प्रचलित असलेल्या चुकीच्या गैरसमजुती याविषयी सविस्तर मार्गर्शन केले. तसेच एड्स हा अनेक रोगांचा समूह आहे. एड्स हा रोग असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित रक्ता द्वारे, दूषित सुया व सिरींज द्वारे, बाधित गर्भवती मातेकढून तिच्या अर्भकाला होतो तसेच प्रतिबंध हाच उपाय आहे. आपण आपल्या आयुष्यात संयमी जीवन जगलात तर आपण एड्स हा रोग टाळू शकतो असे प्रतिपादन मा. सुहास कुलकर्णी यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यानी विचारलेल्या प्रश्नाचे निराकरण केले. एच.आय.व्हि. समुपदेशक मा. धनराज पवार यांनी एच.आय.व्हि.एड्स तपासणी व ए.आर.टी. उपचारपद्धती याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. व्हि.कुलकर्णी होते. त्यांनी अध्यक्षीय समारोप केला. यावेळी आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा.डॉ. यशवंत हंडीबाग, प्रा.डॉ. सारिका संगेकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ऋतुजा सेलुकर या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेड रिबन क्लब समन्वयक प्रा.डॉ. अनिल नरसिंगे यांनी केले. आभार प्रदर्शन कु. साक्षी कुलकर्णी या विद्यार्थिनीने मानले. तसेच यावेळी एच.आय.व्हि./एड्स तपासणी शिबिराचे ही आयोजन करण्यात आले होते. यासाठी स्वा.रा.ती.ग्रा.वै.महा. , अंबाजोगाई येथील एच.आय.व्हि. समुपदेशक मा.धनराज पवार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ मा. विश्वास लवंद यांनी विद्यार्थ्यांची एच.आय व्हि./एड्स तपासणी केली. यावेळी 37 विद्यार्थ्यांनी आपली एच.आय.व्हि./एड्स तपासणी करून घेतली.